fbpx
Friday, October 22, 2021

भान ठेवा, कोरोनाला सणवार कळत नाही; मुख्यमंत्र्यांचे  सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्याचे आवाहन!

 

मुंबई ,11 नोव्हेंबर : दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. आपण स्वत:देखील केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  यंदाची दिवाळी ही दरवर्षीप्रमाणे नाहीय. कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे .

उद्धव ठाकरे  म्हणाले, कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. गेल्या सात आठ महिन्यात आपण सर्व धर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे, त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहे हे विसरू नका.

– युरोपमधील देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती:

युरोपमधील देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते आहे. त्याठिकाणी रुग्ण झपाट्याने वाढत असून त्यांच्यासाठी रुग्णालयांची साधन सामुग्री, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स कमी पडताहेत. दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर तर पुढच्या काळात आपल्याकडेही रुग्णसंख्या बेसुमार वाढून खूप कठीण आव्हान बनेल हे ध्यानी घ्या असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे दिवाळीचा आनंद आपण घेणार असलो तरी दुसरीकडे हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी , पोलीस हे सणवार विसरून कोरोनाशी लढताहेत, तुमचा -आपला सर्वांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा ते पाहताहेत हे कृपया विसरू नका एवढीच विनंती. त्यांची दिवाळी रुग्णालयांमध्ये आणि कर्तव्य बजावताना जाणार आहे. या कर्मचाऱ्यांत आपली आई , वडील, भाऊ बहिण, नातेवाईक, मित्र कुणीही असू शकते. त्यांच्यावरचा ताण न वाढू देणे आणि घरातच राहून सुरक्षितरीत्या दिवाळी साजरे करणे याला प्राधान्य द्या असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले .

– दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु करायचे:

दिवाळीचा  सण मोठा असला तरी आपल्या परिसरात, आपल्या जवळचे, मित्रमंडळी- नातेवाईक यांच्या घरात कोरोनामुळे दु:खद घटना घडलेली असेल. त्यांना या दिवाळीचा आनंद घेता येणार नाही त्यामुळे उत्साह दाखवतांना त्यांचाही विचार मनात राहू द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले. तर आपल्याला दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु करायचे आहेत. पूर्ववत आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे या दिवाळीतही मास्क घालणे- हात धुणे- अंतर पाळणे ही त्रिसूत्री  पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे .

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »