fbpx
Saturday, November 27, 2021

नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त निरोपासमयी झाले भावूक

मुंबईत कायदा-सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झालेले नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील मुंबईला रवाना झाले. नव्या आयुक्तांकडे पदभार सुपुर्द करून शहराचा निरोप घेताना विश्वास नांगरे-पाटील भावूक झाल्याचे वृत्त आहे. ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून त्यांनी नाशिक शहराबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

२६-११ च्या दहशतवादी हल्ल्यातील अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित झालेले नांगरे-पाटील मागील दीड वर्षे नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत होते. महाराष्ट्र शासनाने केलेल्या ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या नावांत विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचाही समावेश होता. त्यांच्या नाशिक पोलीस आयुक्त पदावरील कार्यकाळात आलेले अनुभव नांगरे-पाटील यांनी ह्या ऑडिओ संदेशातून व्यक्त केले आहेत. नाशिककरांना नमस्कार करून त्यांनी ऑडिओ संदेशाची सुरुवात केली आहे. ते म्हणतात, ‘नाशिककर नमस्कार, गेली दीड वर्षे आपली सेवा करण्याची मला संधी मिळाली. आज मी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार नवे आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे देऊन मुंबईला निघालोय. नाशिकसारख्या प्रगत, सुधारणावादी शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. या शहराला सांस्कृतिक, सामाजिक,

पौराणिक, ऐतिहासिक असा वारसा आहे. शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात नाशिकची घोडदौड मोठ्या वेगानं सुरू आहे. इथं काम करताना इथली माणसं, इथली माती, इथलं पाणी, इथला निसर्ग याच्या प्रेमात माणूस पडतोच. या आल्हाददायक, गोड शहराला सोडून जाताना अंत:करण जड आहे. मात्र, हा ऋणानुबंध निश्चितच कायम राहील. आपण माझ्या सदैव संपर्कात राहाल. आपलं प्रेम, आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो.’ यानंतर पुढे ते असेही म्हणतात ‘कोविडसारख्या संक्रमणाचा काळ असो, निवडणूक, सण-उत्सव असो, या काळात आपण सदैव माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात. नाशिकची जनता प्रगल्भ, कायद्याचं पालन करणारी आहे. प्रशासनाच्या चांगल्या उपक्रमात सहभाग नोंदवणारी आहे. त्यामुळंच या शहराची प्रगती वेगाने होत आहे. या शहराच्या प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी सुयश चिंतितो.’

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »